शेतातील कुंपणाला वीजपुरवठा ठरला जीवघेणा,१६ वर्षीय युवकाचा करंट लागून मृत्यू,शेतमालकावर गुन्हा
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील बांबेझरी गावाजवळील शेतात अवैधरित्या सुरू असलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका अल्पवयीन मुलाचा बळी गेल्याची गंभीर घटना २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उघडकीस आली. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय तुषार दिनेश परचाके याचा विद्युत तारेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात शेतमालक कैलास इसरू कुळमेथे (वय २५), रा. बांबेझरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेच्या रात्री तुषार हा मित्रासोबत शेतात गेला होता. रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास गावात आरडाओरड सुरू झाल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. शेतामध्ये तुषार हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या हातापायांवर करंट लागल्याच्या खुणा दिसत होत्या. तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.पोलीस तपासात असे समोर आले की, शेतमालक कैलास कुळमेथे याने आपल्या शेताच्या कुंपणाला कोणतीही अधिकृत परवानगी न घेता थेट विद्युत खांबावरून वीजजोडणी करून विद्युत प्रवाह सुरू ठेवला होता. अशा प्रकारे जिवंत विद्युत तार कुंपणाला जोडल्याने शेतात प्रवेश करणाऱ्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. याच विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने तुषार परचाके याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष तपासात निघाला आहे.या घटनेची नोंद मर्ग क्रमांक ८०/२०२५ अन्वये करून तपास पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतमालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.